गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय राज्यशास्र विभाग, प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व सांगणारे भित्तीपत्रकाचे अनावरण प्रांताधिकारी बाबासाहेब बाघमोडे याच्या हस्ते करण्यात आले. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते "Nothing like voting, I vote for sure" हा विषय घेऊन आयोजित रांगोळी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी श्री. वाघमोडे पुढे म्हणाले, आपल्या आयुष्यात करिअरला जे महत्त्व आहे त्याच पद्धतीचे महत्त्व देशाच्या जडणघडणीत मोलाचे आहे. त्याकरिता मतदारांनी मतदान करणे गरजेचे असे सांगून आजपर्यंतच्या विविध देशातील मतदार अधिकाराचे महत्त्व आणि त्याचे देशाच्या जडणघडणीतील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय? तसेच हा हक्क बजावल्याने समाजात काय परिणाम होऊ शकतो? मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी? याबद्दल नागरिकामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे ? हे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले. भारतात 18 वर्षानंतर लोकांना मतदानाचा अधिकार आहे. नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून येऊ शकतात आणि त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करु शकतील, असे मत प्रांताधिकारी यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी कशाप्रकारे करावयाची, निर्भयपणे कशा पद्धतीने मतदान केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी शिवराज महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती अभियानासंदर्भात राबवलेल्या उपक्रमासंदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मतदानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
यावेळी भित्तीपत्रक स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी आणि मतदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी नायब तहसीलदार गुडे यांच्यासह गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील बी.एल.ओ उपस्थित होते. यावेळी तहसीलदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना निर्भयपणे मतदान करण्याची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. आभार डॉ. आण्णासाहेब हारदारे यांनी मानले.