गडहिंग्लज (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोमवार दि. १० एप्रिल रोजी गडहिंग्लज दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत येथील विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या आर.पी.आय.च्या दिवंगत कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहीली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्यापासून या परिसरात नामदार आठवले यांचे प्रथमच आगमन होत असल्यामुळे कार्यकर्ते त्यांचे यथोचित स्वागत करण्यासाठी झपाट्याने कार्यरत झालेले आहेत.
सदर कार्यक्रम शिवराज विद्या संकुलाच्या परिसरात दुपारी चार वाजता होणार असून कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आर.पी.आय.चे प्रदेश संघटक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जानबा कांबळे, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, शहराध्यक्ष मोहन बारामती, मधुकर कांबळे, जयवंत कांबळे, विठ्ठल चुडाई यांनी केले आहे.

