महागावच्या महात्मा फुले विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागामार्फत व्याख्यान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थी भविष्यातील भारताचे सुज्ञ नागरिक आहेत. देशाच्या जडणघडणीत पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. आपल्या देशात ३२ टक्के क्षेत्र जंगलाने आच्छादने गरजेचा आहे, पण ते आज २८ टक्के क्षेत्र आहे.अजून चार टक्के क्षेत्र वाढवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या अवतीभवती जंगलांना लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांची पर्यावरण रक्षणात जबाबदारी खूप महत्त्वाची आहे.असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एस.एस.पाटील यांनी केले.
महागाव येथील महात्मा फुले विद्यालयात हरित सेना विभागाच्या वतीने जागतिक वन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस.पाटील होते. वनसेवक प्रकाश देवडकर, प्रा.पी.डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रकाश चौगुले यांनी केले. कार्यक्रमात सीडबॉल तयार केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. पी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना वनसंपदा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी पर्यवेक्षक अशोक नांदुलकर, रुबिना सोलापुरे, संजय पाटील, शौकत नांगनुरे, भीमराव भुईंबर, किरण पाटील, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, एकता पाटील, सुवर्णा शेवाळे, शिवाजी सुतार, चंद्रकांत पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. आभार सुभाष सुतार यांनी मानले.



