सामानगड परिसरासंदर्भात आमदार राजेश पाटील यांची उपवनसंरक्षक यांच्याबरोबर चर्चा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आमदार राजेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी किल्ले सामानगड परिसराच्या विकासासंदर्भात उपवनसंरक्षक श्री.गुरुप्रसाद यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान, दिनांक १ किंवा २ एप्रिल रोजी किल्ले सामानगडला भेट देण्याची ग्वाही उपवनसंरक्षक यांनी दिली.
किल्ले सामानगडावरील वनक्षेत्र, निसर्ग पर्यटन विकास तसेच मंदिर, यात्रा स्थळ, रस्ते, जंगलतोड, फळ झाडांची लागवड करणे, गडप्रेमी व भक्त यांच्यासाठी टॉयलेट ब्लॉक बांधकाम करणे याबाबत चर्चा करण्यात आली. आमदार राजेश पाटील यांच्या समवेत माजी सभापती अमर चव्हाण, अभियंता के.टी. शेलार, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, बाबुराव चौगले, जयवंत बिरंजे उपस्थित होते.
हत्ती, गवे आदी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षित शेती करता यावी यासाठी वनक्षेत्र व गावठाण यात मोठा खंदक खोदणे याबाबत चर्चा करण्यात आली. भेटीअंती सर्व विषयांना सकारात्मक प्रतिसाद देत सामानगड परिसराला १ किंवा २ एप्रिलला भेट देण्याचे आश्वसन उपवनसंरक्षक यांनी दिले.

