संकेश्वर- बांदा महामार्ग यंत्रणेकडून अन्याय होत असल्याची महामार्ग बाधित घटकांची भावना
अत्याळ येथील प्रकाराने नागरिकांतून तीव्र नाराजी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम करणाऱ्या यंत्रणेकडून नुकसान केले जात असल्याने महामार्ग बाधित घटकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अत्याळ येथील काही घरांच्या छपरापर्यंत दगड व मुरूम टाकण्यात आल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत.
यावेळी माहिती देताना महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव म्हणाले, महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या व दोन्ही बाजूच्या घरमालकांच्यावर दादागिरी करून अन्याय केला जात आहे. हे सहन केले जाणार नाही. सर्व बाधित शेतकऱ्यांनी संघटित व्हावे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. प्रत्येक गावामध्ये स्वतंत्र बैठका घ्या. त्या बैठकीला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून चर्चा करा. असे आवाहन कॉम्रेड गुरव यांनी महामार्ग बाधित शेतकऱ्यांसह सर्व घटकांना केले आहे.
संघटित होऊन असा अन्याय करणाऱ्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे श्री गुरव म्हणाले. सर्व बाधित शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

