Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या, १५० जागा आम्ही जिंकून दाखवू!

खासदार संजय राऊत यांचे विरोधकांना आव्हान

भाजप-शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र 

गडहिंग्लज येथे शिवगर्जना अभियान मेळावा

गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, कागल मधील शिवसैनिकांची प्रचंड गर्दी

'शिवगर्जना'ने गडहिंग्लज शहर 'शिवसेनामय' 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आव्हान वाटत होते म्हणून गद्दारांनी  शिवसेना फोडली. पाठीत खंजीर खुपसण्याचे षडयंत्र त्यांनी रचले. धोकादडी करून कुणी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी शक्य होणार नाही. असे सांगून हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या १५०  जागा आम्ही जिंकून दाखवू असे  आव्हान खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिले. यावेळी खासदार राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारवर जोरदार तोंडसुख घेतले.   

गडहिंग्लज येथे सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये शिवगर्जना अभियान मेळावा संपन्न झाला. शिवसैनिकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या या अभूतपूर्व सभेला खासदार राऊत यांनी संबोधित केले. शिवगर्जनामुळे उपविभागातील शिवसैनिकांमध्ये नवउर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसले. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड, कागल तालुक्यातील कानाकोपऱ्यातील गावागावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "पन्नास खोके एकदम ओके" अशा घोषणा देत शिवसैनिकांनी एकनिष्ठता दाखवून दिली. खासदार राऊत यांनी देखील समोर उपस्थित शिवसैनिकांना हात उंचावत दाद दिली. दरम्यान, सभेपूर्वी खासदार राऊत यांचे गडहिंग्लजमध्ये आगमन होताच मुख्य रस्त्यावर नागरिकांनी केलेली गर्दी लक्षणीय होती.

यावेळी बोलताना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, बाळासाहेबांनी प्रत्येकाच्या मनामनात शिवसेना रुजविली. वाघाची सेना त्यांनी जन्माला घातली. वाघाचे कातडे पांघरून काहीजण खऱ्या व निष्ठावंत शिवसैनिकांना भिडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना हे कदापी शक्य होणार नाही. कारण शिवसैनिक हे खरे वाघ आहेत. या वाघाबरोबर लढण्याचे धाडस त्यांना होणार नाही. अशी घणाघाती टीका देखील खासदार राऊत यांनी केली.  

आज संपूर्ण महाराष्ट्रतील माता- भगिनी आम्ही शिवसेनेबरोबरच आहोत असे उद्धव साहेबांना मनापासून  सांगतात, मग पळून गेले त्यांची शिवसेना कोणती? हे जनतेला सांगण्याची गरज नाही. चाळीस आमदार गेले म्हणजे शिवसेना नव्हे. त्या चाळीस आमदारांमध्ये जवळपास १५ ते १६ आमदारांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाया सुरू होत्या. मात्र तिकडे गेल्यानंतर या कारवाया थांबविण्यात आल्या. याचाच अर्थ तिकडे गेले की वाशिंग मशीनने साफ केले जाते असा मार्मिक टोला देखील खासदार राऊत यांनी विरोधकांना लगावला.

आमच्यावरही ईडीच्या धाडी पडल्या. या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. 'पक्ष सोडा नाहीतर तुरुंगात जा' अशी भीती दाखविण्यात आली. मात्र 'मरण पत्करेन पण, भगवा सोडणार नाही' असा खणखणीत इशारा त्यांना मी दिला. शंभर दिवसांपेक्षा  जास्त काळ मी तुरुंगात राहिलो. मात्र आपला स्वाभिमान मी गहाण ठेवला नाही. बेइमानी केली नाही. हा स्वाभिमान प्रत्येक शिवसैनिकांच्या नसा नसात भिनला आहे. ज्या पक्षाने तुम्हाला पद, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्याच पक्षाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता हे कदापिही  तुम्हाला पचणार नाही. सच्चे शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. खोट्या कारवाया कदापिही हा शिवसैनिक सहन करणार नाही.  असा खणखणीत इशारा देखील खासदार राऊत यांनी यावेळी दिला.

 'चोरमंडळ' संबोधल्याने  विधिमंडळ सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यात आले. मात्र कितीही आटापिटा केला तरी जनतेला सत्य माहित आहे.  मुंबईवर ताबा मिळवून येथील मराठी माणसाला कंगाल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शिवसेनेच्या शेपटीवर पाय ठेवताय हे लक्षात ठेवा. जखमी वाघ हा भयंकर असतो त्यामुळे हा शिवसेनेचा वाघ तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा देखील खासदार राऊत यांनी विरोधकांना दिला. पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना संपणार नाही. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना रडायला नाही तर लढायला शिकवले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेतून मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावयाचे आहे. कोल्हापूरच्या भूमीतून दिलेला हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर जातो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकनिष्ठतेची ही वज्रमूठ कायम ठेवावी असे आवाहन खासदार राऊत यांनी शेवटी केले.  

५० खोके देता, मग महागाई का कमी नाही?

सध्या देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांची आज अवस्था वाईट झाली आहे. भरमसाठ महागाई वाढल्याने जनता भरडली आहे. असे सांगून ५० खोके देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे मग महागाई का कमी होत नाही? असा रोखठोक सवाल खासदार राऊत यांनी विरोधकांना  केला.

 पानगळ झाले तरच वसंत फुलतो!

 झाडावरची जुनी पाने गळाल्याशिवाय नवीन वसंत फुलत नाही. असा टोला विरोधकांना लगावत आता वसंत फुलतोय, नवीन फुले-फळे येत आहेत हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे असे सांगून विरोधकांना खासदार राऊत यांनी चपराक दिली. 

.....म्हणून 'त्यांनी' फोडली शिवसेना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आव्हान वाटत होते म्हणून 'त्या' मंडळींनी शिवसेना फोडली. पाठीत खंजीर खुपसण्याचे षडयंत्र त्यांनी रचले. धोकादडी करून कुणी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी शक्य होणार नाही. आगामी निवडणुकीत शिवसैनिक तुम्हाला आस्मान दाखवतील असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. 

यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,  माजी आमदार संजयबाबा घाटगे आदींची भाषणे झाली. शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

या मेळाव्याला शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख संतोष चिकोडे, डॉ. रियाजभाई शमनजी, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, प्रकाश पाटील,संभाजी भोकरे, आजऱ्याचे संभाजी पाटील, दीनानाथ चौगुले, युवा सेनेचे प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, शांता जाधव, विद्या गिरी, मंगल जाधव यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.