मांगलेवाडी परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त
(छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील वडरगे रोडवरील मांगलेवाडी कोपरा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे तब्बल आठ महिने रखडलेले काम कालपासून सुरू झाल्याने येथील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्याचे काम पावसाळ्याचे कारण देत थांबविण्यात आले होते. त्यामुळे या परिसरातील रहिवाशी नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत होता. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी वारंवार संबंधित विभागाचे लक्ष येथील नागरिकांनी वेधले होते. मात्र वारंवार दुर्लक्ष होत होते.
दरम्यान, युवा नेते संतोष मांगले व माजी नगरसेवक बाळासाहेब वडर यांच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देऊन त्याकडे लक्ष वेधून याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला होता. दरम्यान कालपासून या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.