माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेधणार शासनाचे लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गायरानातील अतिक्रमणे काढण्याच्या निर्णयाविरोधात तसेच संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागण्यांसाठी गडहिंग्लज येथे जनता दल (सेक्युलर)च्या वतीने माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर उद्या दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जनता दल (सेक्युलर)चे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी दिली. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या मोर्चाची सुरुवात येथील लक्ष्मी मंदिरापासून होणार आहे.
राज्यातील गायरान जमिनीमध्ये ज्यांनी घरे बांधलेली आहेत ती घरे पाडण्यासंदर्भात संबंधित लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्याला विरोध करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील अन्यायग्रस्त नागरिक जनता दलाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
तसेच संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रश्नाकडेही या मोर्चाद्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे. या महामार्गात रस्त्याच्या बाजूस असणारे जमीनधारक, घरे असणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचे नोटीस व संयुक्त असा आदेश मिळालेला नाही. ज्यांची जमीन व घर जाणार आहे त्यांना पूर्व सूचना देऊन त्यांची बैठक बोलावून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी या मोर्चेद्वारे करण्यात येणार असल्याचे जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी सांगितले.