'संत गजानन पॉलिटेक्निक'मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय लष्कर आणि नौदलानंतर आता महिला अग्निविरांची वायुसेनेतही भरती केली जाणार आहे. यासाठीचे सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधा तयार करीत आहोत. वायुदलातील एअरमन सैनिक रँकमध्ये महिलांचा अद्याप समावेश नव्हता तो आता अग्निपथ योजनेतून पहिल्यांदाच महिलांना सैनिक म्हणून संधी मिळणार असल्याची माहिती विंग कमांडर व बेंगलूरु येथील एअरमन सिलेक्शन सेंटरचे कमाडिंग अधिकारी संतोष शेडगे यांनी महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज पॉलीटेक्निकमध्ये आयोजित 'तंत्रशिक्षणानंतर वायुसेनेतील संधी' या विषयावरील आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी एअर कमांडर व विशिष्ट सेवा मेडल प्राप्त जी. एल.हिरेमठ तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत चव्हाण हे होते.
प्रस्ताविक प्राचार्य डी.बी. केस्ती यांनी केले. यावेळी बोलताना कमांडर शेडगे पुढे म्हणाले, केंद्र सरकारने संरक्षण दलात अग्निपथ योजनेची सुरुवात केली आहे. यामुळे देश सेवेसाठी इच्छुक युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या असून तंत्रशिक्षण पूर्ण केलेले युवकही या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठीचे वायुसेनेकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली असून यासाठी युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ही भरती प्रक्रिया कशी व कधी असणार आहे त्याचे निकष काय आहेत याचीही सविस्तर माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी वायुसैनिक अभिषेक कुमार, आदर्श गौतम, अमित रिजवाल, विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, अॕड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. मंगल मोरबाळे, प्रा. आर.एस.पाटील, प्रा.केतन प्रसादी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा. संतोष गुरव यांनी मानले.