गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव रोडवर गडहिंग्लज शहराच्या एन्ट्रीलाच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी हा कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे.
गडहिंग्लज-चंदगड हा मार्ग सतत वर्दळीचा आहे. भडगाव रोडवर पेट्रोल पंप ओलांडताच काही अंतरावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. गेले कित्येक महिने या ठिकाणी जणू कचरा टाकण्याचे ठिकाण असल्यासारखे कचरा टाकला जात आहे. या ठिकाणापासून काही अंतरावरच हिरण्यकेशी नदी वाहते. पाऊस झाल्यानंतर हा कचरा वाहून नदीत मिसळतो. चंदगड- नेसरी वरून गडहिंग्लजकडे येताना हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूल ओलांडल्यानंतर गडहिंग्लजमध्ये प्रवेश सुरू होतो. मात्र शहराच्या स्वागतालाच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. हा कचरा कुजून या ठिकाणी दुर्गंधी सुटलेली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना दुर्गंधीमुळे या ठिकाणी नाक धरून जावे लागते. नागरिकांनीही शहर स्वच्छतेच्या दृष्टीने या ठिकाणी कचरा टाकणे टाळले पाहिजे.
शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून घंटागाडीद्वारे दररोज सुक्या व ओल्या कचऱ्याचे संकलन केले जाते. नगरपालिकेकडून अशी सुविधा उपलब्ध असताना रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणे कितपत योग्य आहे? असा सवाल व्यक्त केला जात आहे. भडगाव रोडवर टाकण्यात आलेला कचरा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. या मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना याचा त्रास सोसावा लागतो. स्वच्छ व सुंदर शहर म्हणून गडहिंग्लज तालुक्याचा जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक आहे. हे वैभव कायम टिकवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. येथील कचरा हटवण्याची मागणी नागरिकातून व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकातून होत आहे.