गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या फिजिक्स विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'फिजिक्समध्ये करिअरच्या संधी" या विषयावर दूधसागर महाविद्यालय बिद्री येथील डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, फिजिक्समध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या खूप संधी आहेत. फिजिक्सच्या विविध शाखा आहेत पण सध्या नवीन असलेल्या मेडिकल व न्युक्लीअर फिजिक्स मधील अद्यावत उपकरणांचा आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचा उपयोग होत आहे. त्यासाठी फिजिक्समधील विद्यार्थ्यांची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी फिजिक्सच्या विविध शाखाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी एक्स-रे चा शोध कशा पद्धतीने लागला याबाबत 'पीपीटी'द्वारे मार्गदर्शन केले. सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास फिजिक्सचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रेवती राजाराम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गौरव पाटील यांनी केले. आभार प्रा. तेजस्विनी शिंदे यांनी मानले.