गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी अनाथ आश्रममध्ये जीवन जगत आयुष्याच्या वाटचालीत आपल्या जगण्याबरोबरच इतरांच्या आयुष्यात आनंद पेरून आपले जीवन खऱ्याअर्थी सार्थकी लावले आहे.असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालय मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात "डॉ.सुनीलकुमार लवटे : जीवन आणि कार्य" या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते.
स्वागत मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी तर प्रास्ताविक कु. दिपाली कांबळे यांनी केले. कु. सानिका बागडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी बोलताना डॉ. हिरेमठ म्हणाले, आयुष्यात दुःख झेलून अनेक अडथळे पार करत येणाऱ्या सर्व अडचणीना दूर करीत शिक्षक ते प्राचार्य अशी मोठी मजल डॉ. लवटे यांनी मारली आहे. आपल्या जीवनात आलेल्या अडचणी इतर अनाथांच्या आयुष्यात येऊ नयेत यासाठी सदैव धडपडणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या कार्यातून त्यांनी अनाथांच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांनी विविध देशात अभ्यास दौरे करून अनाथांच्या जीवनाला कसे बळ देता येईल यासाठी आपले जीवन व्यतीत केले आहे. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास डॉ.आनंदा कुंभार, डॉ. एस.डी. सावंत, डॉ.एन.आर. कोल्हापुरे, प्रा.आशोक मोरमारे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. प्राजक्ता हजारे यांनी केले. आभार कु.तनुजा डोंगरे यांनी मानले.