गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित बेस्ट प्रॅक्टिसेस कार्यशाळेचा शुभारंभ विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथील प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम. कदम तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. प्रवीण मंदूगडे यांनी केले. पूर्ण सप्ताहामध्ये चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये भौतिकशास्त्रातील प्रात्यक्षिकासाठी मूलभूत साधने याची विस्तृत माहिती प्रथम वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. बी.व्ही. ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये विद्यार्थी हिताच्या दृष्टीने प्रात्यक्षिकाचे महत्व विशद केले. त्याचबरोबर आपल्या करिअरमध्ये भौतिक शास्त्रमध्ये असणाऱ्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र मध्ये आपले करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागावे असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विजय सावंत यांनी केले. आभार प्रा. तेजस्विनी शिंदे यांनी मानले.
भित्तीपत्रक स्पर्धाही संपन्न
शिवराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागामार्फत आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शन स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानचे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. गौरव पाटील यांनी केले. पोस्टर प्रदर्शनास विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध स्पर्धा व कार्यशाळा यांच्यामध्ये सहभागी होऊन आपल्यातील क्षमता सिद्ध करावे लागेल तरच आपण आधुनिक स्पर्धेत यशस्वी होणार आहे असे सांगितले.
सदरच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रककामधून उत्कृष्ट प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा. रेवती राजाराम यांनी मानले.