Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई विमानतळावर ५ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे सोने जप्त

🔈एकूण १२ किलोची सोन्याची बिस्किटे

🔈सुदानी प्रवाशांना अटक

🔈६ प्रवाशांना काळ्या यादीत टाकले

🔈अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न हाणून पाडला

🔈सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केली कारवाई 


मुंबई (सौजन्य : पीआयबी):
मुंबई विमानतळावर  सीमाशुल्क विभागाने  सुदानी प्रवाशांकडून ५ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे सोन्याची १२ किलो वजनाची बिस्किटे  जप्त केली. सुदानी प्रवाशांचा हा गट दुबईहून एमिरेट्स फ्लाइट AK-500 ने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेला होता.

सुमारे 23 सुदानी प्रवाशांच्या एका गटाने एकत्र येऊन कस्टम अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित  करण्यासाठी  गोंधळ निर्माण करून ग्रीन चॅनलमधून बाहेर पडण्याचा  प्रयत्न केला. सुदानी प्रवाशांनी सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ घातला तसेच अधिकाऱ्यांसमोर आरडाओरड करून आक्रमक पवित्रा घेतला आणि काहीजण मारामारी देखील करू लागले. मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी हा प्रकार अतिशय व्यावसायिकतेने हाताळला. पुरेशी कुमक घेऊन त्यांनी  या आक्रमक प्रवाशांना आवरलं  आणि परिस्थिती नियंत्रणात  आणली. सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ निर्माण करून धूर्तपणे सोने घेऊन पलायन करायचा त्यांचा डाव हाणून पाडला.

गोंधळ करून  पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाने परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या पट्ट्यात लपवून ठेवलेल्या प्रत्येकी एक किलो वजनाची १२ सोन्याची बिस्किटे  सीमाशुल्क अधिकार्‍यांच्या प्रभावी आणि जलद कारवाईमुळे   हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून वेगळे वर्तन करणाऱ्या अन्य पाच प्रवाशांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

चौकशीतून असे निष्पन्न झाले की मुंबई विमानतळावर आलेले हे सहा प्रवासी नियोजित कट कारस्थान करून गोंधळ निर्माण करून सोने घेऊन पलायन करणाऱ्या प्रवाशाला मदत करणार होते. या पाच प्रवाशांनी सोने तस्करी करण्याच्या पूर्वकल्पित कटाचा भाग असल्याची कबुली दिली असून ज्या प्रवाशाकडून सोने जप्त करण्यात आले त्याच्यासह त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांना २३ सप्टेंबर पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याशिवाय तपासणीत अडथळा निर्माण करणाऱ्या इतर सहा प्रवाशांना देखील पकडण्यात आले. मुंबई विमानतळ कार्यालयाच्या ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या मदतीने या सहा प्रवाशांना काळ्या यादीत टाकून सुदानला परत पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.