गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयातील कै. डॉ. एस.डी.पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे.
यावेळी माहिती देताना डॉ. अनिल कुराडे म्हणाले, या भागातील ग्रामीण विद्यार्थी, विद्यार्थिनी विविध क्षेत्रात अधिकारी व्हावेत यासाठी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी कै. डॉ. एस. डी. पाटील यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दरवर्षी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी व्हावेत यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चमकलेल्या विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ म्हणून कार्यरत असणारे अधिकारी यांच्या कार्याचा अनुभव आणि विविध तज्ञ नामवंतांचे मार्गदर्शन आमच्या स्पर्धा परिक्षा केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक व ग्रामीण भागातील अनेक युवक सध्या मार्गदर्शनाअभावी भरकटत आहेत. त्यांच्या पंखात बळकटी यावी यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आशेचा किरण प्राप्त व्हावा यासाठी शिवराज महाविद्यालयाचा हा विशेष उपक्रम सुरू आहे.
महाविद्यालयाच्या राज्यसेवा, बँकिंग, पोलीस भरती संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा वाचनालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.एन.बी. एकिले (9665931398) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस. एम. कदम यांनी केले आहे.
हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सर्वांसाठी खुले आहे. महाविद्यालय व्यतिरिक्त आणि इच्छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाची अट न घालता आमच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. एन. बी. एकिले यांनी सांगितले.