मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे प्रशासनाचे आदेश
बेळगाव: पावसाने सर्वत्र धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला असून सीमाभागातील बेळगाव जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. बेळगाव जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार सुरूअसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १७ पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठ परिसरातील पाण्याचा विसर्ग वाढत चालल्याने नदी काठावरील लोकांना खबरदारी म्हणून स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यासह पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे घटप्रभा, मलाप्रभा आणि हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. घटप्रभा नदीतून रविवारी सायंकाळपर्यंत २८ हजार क्युसेक पाणीसाठा होता. तर राजा लखमगौडा जलाशयातून सध्या २८ हजार क्युसेक एवढ्या जादा पाण्याचा विसर्ग सुरूआहे.
याशिवाय बळ्ळारी नाला आणि हिरण्यकेशी नदीसह घटप्रभा नदीत एकूण ३७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पश्चिमघाट, कणकुंबी आणि खानापूर येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मलाप्रभा नदीत ही पाण्याची आवक वाढली असून नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे. रामदुर्ग शहराला जोडणारा जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम घाट आणि बेळगाव जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय शंभर टक्के भरले आहेत. जलाशयातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने घटप्रभा आणि हिरण्यकेशी नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते.