केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून ‘जल नायक/नायिका:सांगा तुमच्या कहाण्या' स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर
नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी): केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून सुरू असलेल्या जलनायक नायिका : सांगा तुमच्या कहाण्या या स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये दिव्यांश टंडन (मीरत), विनय विश्वनाथ गवस (केरी सत्तरी), अमित (उत्तर प्रदेश), बबीता राजपूत घुवारा (मध्य प्रदेश), अनुराग पटेल (बांदा), स्नेहलता शर्मा (शिवपुरी) यांचा विजेत्या स्पर्धांमध्ये समावेश आहे.
केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने ‘जल नायक/नायिका:सांगा तुमच्या कहाण्या स्पर्धे’ची सुरुवात केली आहे. या प्रकारातील तिसरी स्पर्धा मायगव्ह पोर्टलवर १ डिसेंबर २०२१ रोजी सुरु झाली असून ती ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. दुसरी स्पर्धा १९ सप्टेंबर २०२० रोजी सुरु होऊन ३१ ऑगस्ट २०२१ रोजी संपली.
जल-संधारण तसेच जल-स्त्रोतांच्या शाश्वत विकासासाठी सुरु असलेल्या देशव्यापी प्रयत्नांना पाठबळ पुरविणे आणि एकुणातच पाण्याचे महत्त्व जनतेत रुजविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना उत्तेजन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात जल संधारणाचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. जल नायक/नायिका यांचे अनुभव सामायिक करून तसेच या संदर्भातील माहितीचा प्रसार करून जल संधारणाच्या आवश्यकतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच सर्व संबंधित भागधारकांमध्ये वर्तणूकविषयक बदल होईल, अशा प्रकारे जल संधारण आणि व्यवस्थापन याकरिता आवश्यक असलेला दृष्टीकोन निर्माण करणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.
ऑगस्ट 2022 या महिन्यासाठी या स्पर्धेच्या खालील सहा विजेत्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पारितोषिक म्हणून दहा हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विजेत्या स्पर्धकांची ओळख पुढील प्रमाणे :
दिव्यांश टंडन
मीरत येथील दिव्यांश टंडन “पाणी पंचायत” या अभियानाशी संबंधित असून या अभियानाच्या माध्यमातून ते विविध गावे, रस्ते, शाळा, वसाहती या ठिकाणी भेट देऊन जनतेमध्ये या संदर्भात जागृती निर्माण करतात. ते सारथी समाज कल्याण संस्थेचे (मीरत कँटोन्मेट) उपाध्यक्ष आहेत.
विनय विश्वनाथ गवस
विनय गवस गोव्यातील केरी सत्तरी परिसरातील केळवदे गावात छतावरील पर्जन्य जल संधारण आणि कूप-नलिका पुनर्भरण याकरिता सुरु केलेल्या अभियानाचे प्रकल्प संचालक आहेत. टीईआरआय या संस्थेच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला जात आहे.
अमित
उत्तर प्रदेशात जालोन भागातील मलकपुरा येथील ग्राम प्रमुख असलेले आणि दिल्लीत पत्रकारिता करणाऱ्या अमित यांनी गावातील प्राथमिक शाळेत आरोग्यदायी अन्न पुरविणे, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि अवसादन प्रक्रिया करून जल शुद्धीकरण करणे अशा अनेक विकासात्मक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे.
बबिता राजपूत घुवारा
मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बबिता राजपूत घुवारा या चार चेक डॅम आणि दोन आउटलेट यांच्या बांधकामात तसेच बोरी बंधन निर्मितीच्या कामात सहभागी आहेत.
अनुराग पटेल
बांदा येथे जिल्हा न्यायदंडाधिकारी असलेल्या अनुराग पटेल यांनी जल संधारणाच्या संदर्भात लक्षणीय प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ‘जल संचय,जीवन संचय’ आणि ‘जल कुंभी हटाओ-तालाब बचाओ’ ही दोन महत्त्वाच्या अभियाने सुरु केली आहेत. परिसरातील 126 तलावांमधील जलपर्णी काढून टाकण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरु केले. नूतनीकरण करण्याच्या हेतूने काही अधिक मैल खोदकाम करून चंद्रवाल नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मिर्झापूरमधील 664 आणि जनपद फरुखाबाद मधील 101 तलावांना पुनर्जीवन मिळाले आहे.
स्नेहलता शर्मा
शिवपुरी जिल्ह्यातील पिपरोधा मधील बदरवास ब्लॉक येथील स्नेहलता शर्मा गेल्या एक वर्षापासून जल संधारण आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्य करीत आहेत. गावामध्ये पाणी आणि त्याचे संधारण या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिलांना आघाडीवर आणले. शेतात कमी पाण्यावर होऊ शकणाऱ्या पिकांविषयी देखील त्यांनी जनजागृती केली आहे.
ही स्पर्धा मासिक तत्वावर भरविली जात असून तिची माहिती मायगव्ह या पोर्टलवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी त्यांच्या १ ते ५ मिनिटांच्या कालमर्यादेतील व्हिडिओच्या स्वरूपातील जल संधारणाशी संबंधित यशोगाथा साधारण ३०० शब्दांच्या लेखी वर्णनासह आणि त्यांचे कार्य दर्शविणाऱ्या काही फोटोंसह या पोर्टलवर पाठविणे अपेक्षित आहे. तसेच, हे स्पर्धक (त्यांच्या व्हिडिओच्या यू ट्यूब लिंकसह) www.mygov.in येथे सामायिक करू शकतात. त्याशिवाय, अर्जदारांना त्यांच्या प्रवेशिका waterheroes.cgwb[at]gmail[dot]com या संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील सादर करता येतील. अशी माहिती देण्यात आली आहे.