शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबई (प्रतिनिधी): राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट व भाजपाची सत्ता आली. हा राजकीय सत्तानाट्याचा अंक संपल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह "धनुष्यबाण" कोणाचा यावरून जोरदार राजकीय घमासान सुरू झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेच्या "धनुष्यबाण" चिन्हावर आपला दावा करण्याचे संकेत आहेत. यावरून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. मात्र दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना गाफील न राहता प्रसंगी कायदेशीर लढ्यात अपयश आल्यास नवे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचविण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हावरून मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये यासाठी शिवसैनिकांनी प्रसंगी नवे चिन्ह प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी तयारी ठेवावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या धनुष्यबान चिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.