गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) मध्ये निवड झाल्याबद्दल सविता कल्लाप्पा नाईक व दिल्ली येथील राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे यश मिळवल्याबद्दल तबसुम गुलाब छडेदार ह्या दोघींचा तेरणी (ता.गडहिंग्लज) येथील बसवेश्वर सहकारी दूध संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सविता नाईक, तबसुम छडेदार यांचा सत्कार बसवेश्वर दूध संस्थेच्या वतीने श्रीमती शकुंतला गिडचीणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण देसाई, उपाध्यक्ष संजय जोशी, श्रीमती मंगल इंगवले, शंकर निंबाळकर, मलाप्पा भंगारी, केंपया पट्टदेवरू, शंकर ढब, अशोक मगदूम, अण्णाप्पा नाईक, दूध संस्थेचे सचिव करवीर नावलगी यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी व पालक उपस्थित होते.
सविता नाईक हिची सीआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. ती यशस्वीरित्या प्रशिक्षणही पूर्ण करून परतली आहे. तर तबसुम छडेदार हिने युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय दिल्ली आयोजित नेताजी सुभाषचंद्र विश्वविद्यालय येथील राष्ट्रीय एकता शिबिरात घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवराज महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या दोघींनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या ह्या यशाने तेरणी गावचे नावलौकिक झाले आहे. याबद्दल बसवेश्वर दूध संस्थेने त्यांचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

