हुक्केरी व जोल्ले परिवारामुळे एकसंबा गावचे नावलौकिक
हत्तरगी(नामदेव पंढरी) : चिकोडी तालुक्यातील एकसंबा या गावाला तीन आमदार व एक खासदार लाभल्याने या गावाचे नाव बेळगाव जिल्ह्यात चर्चेत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर व या नेत्यांनी करत असलेल्या विविध विकास कामामुळे ही परंपरा अखंडित सुरू असल्याने कर्नाटकात या गावची ख्याती आहे. विधान परिषदेवर प्रकाश हुक्केरी हे विजय झाल्यानंतर एकसंबा गावच्या या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
माजी खासदार व विद्यमान विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व त्यांचे सुपुत्र चिक्कोडी- सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी(काँग्रेस), खासदार अण्णासाहेब जोल्ले व त्यांच्या पत्नी निपाणीचे आमदार सौ. शशिकला जोल्ले (भाजप) हे चौघे एकसंबा या एकाच गावचे आहेत.
खासदार अण्णासाहेब जोल्ले हे भाजपचे दिग्गज नेते आहेत. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या श्री.बिरेश्वर पतसंस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटकात शाखा आहेत. या संस्थेचा मोठा विस्तार आहे व नावाजलेली संस्था आहे. खासदार जोल्ले यांनी सहकार क्षेत्रातून एकसंबा या गावचे नाव पुढे आणले आहे.
विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी व खासदार अण्णासाहेब जोल्ले हे एकमेकांविरोधात असले तरी प्रत्येकवेळी ह्या गावचा उमेदवार राज्यात व केंद्रात असणार हे मात्र नक्की.
प्रकाश हुक्केरी यांनी ग्रामपंचायत, जि. प .सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, खासदार, मंत्री आदी खाती यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांची एक वेगळी छाप व ख्याती आहे. प्रकाश हुक्केरी यांचे क्षेत्र चिकोडी तालुका पुरते मर्यादित होते, मात्र आता बेळगावसह विजापूर,बागलकोट पर्यंत विस्तार झाले आहे.
चिक्कोडी - सदलगा मतदार संघात दोघेही परिचित आहेत. गेल्यावेळी नगरपंचायतीमध्ये खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची सत्ता आली. यावेळी नगरपंचायतीमध्ये माजी खासदार, विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांची सत्ता आली आहे.एकसंबा हे राजकीय केंद्र म्हणून समजले जाते. सत्ता कोणाची आली तरी अण्णासाहेब जोल्ले किंवा आमदार प्रकाश हुक्केरी यांचीच येथे गणिते ठरलेले असतात. हे मात्र निश्चित. एकंदरीत हुक्केरी व जोल्ले यांच्या माध्यमातून एकसंबा गावाला तीन आमदार व एक खासदार लाभल्याने बेळगाव जिल्ह्यात हे गाव चर्चेत आहे.

