गडहिंग्लज : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यात घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता पुन्हा राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर गेली दोन-तीन महिने हलकर्णी मतदार संघात थंडावलेली मोर्चेबांधणी पुन्हा वेग घेणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपल्याने कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जाहीर होणार ह्या अंदाजाने हलकर्णी मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. हत्तरकी गटासह राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलल्याने मोर्चेबांधणी थंडावल्याचे चित्र दिसत होते. हलकर्णी मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात हत्तरकी गट व राष्ट्रवादी हे दोन पक्ष पारंपरिक आहेत. मात्र या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे रियाजभाई शमनजी यांची नव्याने एन्ट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. श्री शमनजी यांनी बसर्गे येथे शिवसेनेचा मेळावा घेत आपली उमेदवारी जाहीर केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हलकर्णी मतदारसंघातील जनतेच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत प्रसंगी आंदोलन करत काही प्रश्न मार्गी लावण्याचाही प्रयत्न केला आहे. या माध्यमातून त्यांनी लोकसंपर्क वाढवला होता. दरम्यान,नांगनूर परिसरात हिरण्यकेशी पाणी प्रदूषणाच्या प्रश्नावर शिवसेनेने लक्ष घालत या प्रश्नी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.
या पाठोपाठ या मतदारसंघात डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली होती.या मतदारसंघातून डॉ.व्हसकोटी सध्या राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हा ओबीसी सेलचे नेतृत्व आहे. हलकर्णी मतदार संघात जनतेच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत व त्यांची सोडवणूक करत व्हसकोटी यांनी मोठ्या प्रमाणात लोकसंपर्क वाढवलाआहे. मुख्यत्वेकरून या भागातील काही गावांमध्ये पाण्याची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने काही ठिकाणी त्यांनी विंधन विहिरी खोदून दिले आहेत .त्यामुळे जनतेतून त्यांना मोठी सहानुभूती आहे .या माध्यमातून त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी जि प सदस्य जयकुमार मुन्नोळी व डॉक्टर गंगाधर व्हसकोटी हे दोन दिग्गज कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादीला बळकटी आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी हलकर्णी मतदार संघात कोट्यावधीच्या विकासकामांचा धडाका सुरू ठेवत जनतेची मने जिंकली आहेत.विकास कामांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने हम भी कुछ कम नही है हे दाखवून दिले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादीने आपला लोकसंपर्क वाढविला आहे .विकास कामांचा धडाकामुळे मतदारसंघातील जनतेतून राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचे चित्र आहे.
यापाठोपाठ हत्तरकी गटानेही गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत नव्या विकास कामांची सुरुवात ह्या मतदारसंघातील गावागावात करत त्यांनीही लोकसंपर्क वाढवला आहे. या मतदारसंघात हत्तरकी गटाची ताकदही मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्यात हत्तरकी गटाच्या ताकदीची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होते.स्व.राजकुमार हत्तरकी यांनी आपल्या गटाला उत्तम रित्या एकसंध बांधून ठेवले होते.ही परंपरा त्यांच्या पत्नी माजी जि प सदस्य रेखाताई हत्तरकी व त्यांचे चिरंजीव सदानंद हत्तरकी यांनी अखंडितपणे ठेवले आहे. तसेच या मतदारसंघाकडे भाजपनेही लक्ष केंद्रित केले आहे .त्यामुळे या मतदारसंघातील लढती या चुरशीच्या होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. एकंदरीत ओबीसी आरक्षणा च्या मुद्द्यावरून पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकीमुळे थंडावलेली मोर्चेबांधणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे. सध्या तरी या मतदारसंघात असे चित्र आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने लोकसंपर्क वाढवत मोर्चेबांधणी केल्याचे दिसत आहे. आता गेली दोन-तीन महिने थंडावलेली मोर्चेबांधणी पुन्हा वेगाने सुरू होणार आहे. हे मात्र निश्चित.

