गडहिंग्लज : प्रतिकूल परिस्थितीशी झगडत व खडतर वाट तुडवीत बाबुराव अत्याळे यांनी पोलिस दलात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पोलीस दलात सेवा बजावताना व सेवानिवृत्तीनंतरही अत्याळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांची जिद्द व चिकाटी आजच्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक व आदर्शवत आहे असे प्रतिपादन माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी केले.
तेरणी गावचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातून पोलीस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले बाबुराव रामा अत्याळे यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवानंद मठपती, तेरणीचे सरपंच मोसीम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे, सदस्य नागराज पाटील, सदस्य अर्जुन कांबळे , नेव्हीचे सेवानिवृत्त अधिकारी सुरेश लांडे, विठ्ठल नरेवाडी उपस्थित होते. प्रारंभी प्राध्यापक दत्तात्रय नाईक यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी त्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबुराव अत्याळे यांचा परिचय थोडक्यात करून दिला. यावेळी बोलताना ॲड. शिंदे पुढे म्हणाले, बाबुराव अत्याळे यांच्या कुटुंबाबरोबर आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमचा एक वेगळा ऋणानुबंध या कुटुंबासोबत आहे. अत्याळे यांनी 81 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे. पोलीस दलात विविध पदांवर प्रामाणिक व सचोटीने केलेले काम आजच्या पिढीला मार्गदर्शक व आदर्श घेण्यासारखे आहे. पोलिस दलात कार्यरत असताना व निवृत्तीनंतरही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या गावाप्रति त्यांनी नेहमीच प्रेम व आपुलकी ठेवली आहे. गुरूकडून शिष्याच्या वाढदिवसाचा हा सन्मान माझ्यासाठी फारच भाग्याचा आहे. असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले. तेरणी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी केलेला हा सत्कार म्हणजे बाबुराव अत्याळे यांच्या सामाजिक बांधिलकीची पोचपावती आहे असे सांगून त्यांनी बाबुराव अत्याळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई म्हणाले, बाबुराव अत्याळे यांनी मुंबईत पोलिस दलात सेवा बजावत असताना केवळ आपलाच विचार न करता सामाजिक जाणिवेतून तेरणीतून नोकरीसाठी मुंबईत गेलेल्या मुलांना तेथे राहण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी तेरणी ग्रामस्थ मंडळ नावाने एक कायमस्वरूपी खोली उपलब्ध करून दिली हे फार मोठे काम त्यांनी त्या काळात केले असून आज यामुळे नोकरीनिमित्त तेरणी गावातून मुंबईत गेलेल्या तरुणांची सोय झाली आहे. हे त्यांचे उपकार तेरणीकर कधीही विसरू शकणार नाहीत असे सांगत त्यांनी वाढदिवसानिमित्त बाबुराव अत्याळे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत अकरावी पर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या बाबुराव अत्याळे यांचा खडतर प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. जिद्द व मोठ्या कष्टाच्या जोरावर त्यांनी पोलीस दलात विविध पदावर काम केले. पोलीस निरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले. 81 वर्षात त्यांनी आता पदार्पण केले आहे. त्यांच्या 81 व्या वाढदिवसाला येण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. पोलीस दलात सेवा बजावत असताना त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी ही आदर्शवत आहे. तेरणीतील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे असे सांगून वाढदिवसानिमित्त श्री अत्याळे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, सरपंच मोसिम मुल्ला यांनी आपल्या मनोगतातून श्री अत्याळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी तेरणी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाबुराव अत्याळे यांना 81 व्या वाढदिवसानिमित्त मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देत त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. सत्कारमूर्ती श्री.अत्याळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. मान्यवरांच्या मनोगत व शुभेच्छा कार्यक्रमानंतर श्री .अत्याळे यांना मित्रपरिवारासह उपस्थित पै पाहुणे तसेच तेरणी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय नाईक यांनी केले. कार्यक्रमास अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेरणी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
![]() |
| तेरणी : कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ. |



