ठाकरे शिवसेनेचा इशारा ; जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार): आजरा शहरात गांधीनगर जवळ उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात विविध सेवा सुविधा पुरवण्यात येतील. हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यात येईल त्याचबरोबर आजऱ्याच्या वैभवात भर घालणारे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापट्टू तयार होण्यासाठी प्रयत्न राहील असे आश्वासन या क्रीडा संकुलाबाबत देण्यात आले होते. परंतु आजरा तालुक्यातील या क्रीडा संकुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून दोन ते तीन वर्षे झाली तरी ही इमारत अजूनही धूळ खात पडली आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा तर्फे क्रीडा संकुल कर्मचारी नेमणूक करून खेळाडूंसाठी हे संकुल खुले नाही केले तर शिवसेना आपल्या स्टाईलने या इमारतीचे उदघाट्न करून संकुल खेळाडूंसाठी खुले करेल असा इशारा कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर हे आमदार असताना या क्रीडा संकुलला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर निधीअभावी व जागा रिकामी नसल्याने काम रखडले होते. यावेळी शिवसेनेने वारंवार बैठका, आंदोलने व मोर्चे काढून हा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून क्रीडा संकुलाची इमारत बांधण्यात आली. त्यावेळी सांगण्यात आले होते की, हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यात येईल, आजऱ्याच्या वैभवात भर घालून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी तयार होतील परंतु दोन ते तीन वर्षे ही इमारत बांधून तशीच पडून आहे. त्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या बाजूने व समोर झाडे झुडपे वाढून इमारत धूळ खात पडली आहे. या इमारतीमध्ये बॅटमिंटन, कबड्डी यासारखे इनडोअर खेळ आजरा तालुक्यातील खेळाडूंना खेळता येतील.
आज आजरा तालुक्यात अनेक मुले -मुली राज्यस्तरीय विविध स्पर्धाच्यामध्ये तालुक्याचे नावलौकिक करीत आहेत. त्यांना सरावासाठी कोणतीही हक्काची जागा उपलब्ध नाही. क्रीडा विभागामार्फत कर्मचारी नेमणूक झालेली नाही. क्रीडा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि कारभारामुळे शासनाचा कोट्यावधीचा निधी खर्च होऊन सुद्धा या संकुलाचा फायदा खेळाडूंना होत नाही. जर पुढील आठ दिवसात तात्काळ हे क्रीडा संकुल कर्मचारी नेमणूक करून खेळाडूंसाठी खुले केले नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने या इमारतीचे उदघाट्न करून खेळाडूंसाठी खुले करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाध्यक्ष युवराज पोवार, जिल्हाध्यक्ष अवजड वाहतूक सेना हर्षल पाटील आदींच्या सह्या आहेत.

.jpg)