Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्मार्ट मीटर बाबत आरदाळकर आक्रमक ; आंदोलनाचा दिला इशारा



आजरा (हसन तकीलदार) : आरदाळ (ता. आजरा) येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात बंड पुकारले आहे. कोणतीही पूर्व सूचना वा कल्पना न देता तसेच मागणी नसतानाही गावामध्ये जवळपास 137 जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सदर मीटर काढून घेऊन पूर्ववत जुने मीटर बसवण्याची मागणी आरदाळवासियांनी केली आहे. जर कार्यवाही झाली नाही तर उत्तूर वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

        


महावितरण तर्फे सध्या सर्वत्र आधुनिक स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. हे स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ही एकूणच खाजगीकरणाची नांदी असल्याने भाविष्यात त्यामुळे सर्वसामान्यांना वीज दरात मिळणारी सवलत बंद होण्याची भीती वाटत आहे. त्याचप्रमाणे वीज बिले वाढवून येत असल्याच्या अफवाही याला कारणीभूत ठरत आहेत. पुढे जाऊन ही स्मार्ट मीटर प्रिपेड मीटर होण्याची भीतीही ग्राहकांच्या मनात असल्याने स्मार्ट मीटरला सर्वत्र विरोध होताना दिसत आहे. वीज निर्मितीमध्ये आताच अनेक खाजगी कंपन्या आहेत मात्र स्मार्ट मीटरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छोट्या मोठ्या सगळ्याच ठिकाणांची वितरण व्यवस्थाही खाजगी कंपनीकडे जाईल आणि असे झाल्यास घरगुती आणि कृषी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा बंद होतील परिणामी वीज दरवाढीचा झटका सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी ग्राहकांना बसेल अशी भीती नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.




आरदाळ (ता. आजरा) येथेही अशाच पद्धतीने कोणतीही पूर्व सूचना न देता गावातील 137 मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सदर स्मार्ट मीटर बदलून पूर्ववत पूर्वीचे जुने मीटर तात्काळ बसवावेत नाहीतर दिनांक 23/09/2025 रोजी सकाळी 11 वाजता उत्तूर येथील वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा आरदाळ वासियांनी निवेदनातून दिला आहे. सदरचे निवेदन ठाणे अंमलदार उत्तूर व सहाय्य्क अभियंता वीज मंडळ उत्तूर यांना देण्यात आले आहे.


निवेदनावर कॉ. शिवाजी गुरव, सूर्यकांत पाटील, अण्णासो जाधव, अमोल बांबरे, शिवाजी जाधव, आनंदा नाईक, सुभाष कांबळे, राजेंद्र जाधव, प्रतीक कुडवे, बापूसाहेब शेळके, तानाजी गुरव, आनंदा सुतार, बाळू शिवणे, बापू जाधव, विठ्ठल पोवार, भिकाजी शिवणे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.