आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
आजरा (हसन तकीलदार) : आजरा आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्य प्रवाशाबरोबरच विद्यार्थ्यांनाही बसत आहे. एस. टी. चे वेळापत्रक कोलमडल्यामुळे बऱ्याच डोंगरी व जंगली भागातील विद्यार्थ्यांना सायंकाळी गावाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागते. तर वृद्ध, महिला प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना जंगलातून जीव मुठीत घेऊन जीवघेणी पायपीट करावी लागत आहे. याबाबत गेल्या वर्षापासून शिवसेना (उबाठा)ने पाठपुरावा सुरु केला आहे. तात्पुरती मलमपट्टी करून परत ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था आगार व्यवस्थापनाची आहे. आजरा आगाराच्या प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे आणि या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना (उबाठा) तर्फे शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी 11:30 वा. आजरा आगारावर तिरडी मोर्चा काढणार असल्याबाबत आजरा पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले आहे.
आजरा तालुका हा डोंगराळ व ग्रामीण भाग असलेने तसेच शहरात मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल व शासकीय कार्यालये आजरा शहरात असलेने खेडेगावातील नागरिक, रुग्ण, महिला व विद्यार्थ्यांना जादातर एस. टी. हेच प्रवासाचे मुख्य साधन व माध्यम आहे. प्रवाश्यांच्या सेवेसाठी बिरूदावली घेऊन घोडदौड करणारी लालपरी मात्र आजरा एस. टी. आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे बदनाम होत आहे. वारंवार मागणी करुनसुद्धा आगार प्रमुख याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आजरा तालुक्यासाठी एस. टी. चे वेळापत्रक साफ चुकीचे असलेमुळे वेळेत बसेस बसस्थानकावर येत नाहीत. वस्तीच्या बहुतांशी गाड्या बंद केल्या आहेत. काही फेऱ्या दुसऱ्या मार्गाने सोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री 8ते 9वाजता घरी पोहचावे लागते. त्याचप्रमाणे काही नागरिकांना वेळेत कामावर व घरी पोहचता येत नाही. महाराष्ट्रात नंबर एकला असणारे आजरा आगार व्यावस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. केवळ रनिंगच्या नादात अर्निंगकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. अशा नियोजनशून्य व बेजबाबदार अधिकाऱ्यांना व प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना उबाठा शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी 11:30 वाजता आजरा आगारावर तिरडी मोर्चा काढणार असलेबाबत तालुकाध्यक्ष युवराज पोवार यांनी आजरा पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व युवासेना उपतालुका प्रमुख अमित गुरव उपस्थित होते.


