Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण; उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे



मुंबई :  राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.


राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.


राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्‍ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापि, आधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.


राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 2 कोटी 4 लाख 63 हजार 392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत यापैकी 1 कोटी 91 लाख 35 हजार 296 विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरली आहेत. उर्वरित पाच लाख 27 हजार 602 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. तर, 63 हजार 009 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे. तसेच, 7 लाख 37 हजार 485 विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहेत.


बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. तसेच सर्व शाळांनाही आवाहन करण्यात आले आहे. याकरिता प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ (UDISE+) या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना व विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे. तसेच NEET, JEE, CUFT यासारख्या स्पर्धा व विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.


आधार अद्ययावत करणे ही प्रक्रिया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षण आयुक्तांना आधार प्राधिकरणाच्या मदतीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित करण्यात यावीत आणि आधारची नोंदणी व आधार अद्ययावत करणे याबाबत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात यावे असे कळविले आहे. यामुळे राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांची आधारशी संबंधित माहिती संलग्नित करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीमधील विसंगती, त्यामधील त्रुटी/ तफावत दूर करून आधार क्रमांक वैध करण्यासाठी व त्याकरिता येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या विशेष मोहिमांमध्ये आधार प्राधिकरणाची नक्कीच मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.