आजरा (हसन तकीलदार): केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे अशी उक्ती आहे. यालाच अंगीकारत स्व. विमालाबाई सरदेसाई ट्रस्टचे संस्थापक लाटगावचे सामाजिक कार्यकर्ते रणजित सरदेसाई यांनी एक आदर्शवत कार्य करीत युवकांना आदर्श दिला आहे. गांधीनगर येथे गटारीच्या कामकाज आणि दर्जावरून अर्ध्यावरच गटारीचे काम थांबवले गेले. याचा परिणाम म्हणून अर्धवट गटारीतील सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून गुडघ्याएवढे पाणी साचू लागले. याचा परिणाम वाटसरू, विद्यार्थी आणि वाहतुकीवर होऊ लागला. वारंवार तोंडी मागणी करुनदेखील नगरपंचायतीने नेहमीप्रमाणे कानाडोळा केला. शेवटी स्व. विमलाबाई सरदेसाई ट्रस्टचे संस्थापक रणजित सरदेसाई यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून या खड्ड्यामधून स्वखर्चाने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे मुजवून घेऊन रस्त्याची डागडुगी केली याबद्दल गांधीनगरच्या धर्मवीर नवरात्रौत्सव मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी सरदेसाई म्हणाले कि, चित्रा खोऱ्यातून जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे. लाटगाव, पोळगाव, खानापूर, पारोली, चित्रीप्रकल्प, आवंडी वसाहत, ग्रामीण रुग्णालय इ. ठिकाणी या रस्त्याचा वापर होत असतो. खड्डे पडल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, तसेच वृद्धाना या खड्ड्यांचा त्रास होत होता. आपलं कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी समजून आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतं याच उदात्त हेतूने आमच्या ट्रस्टने हे काम केले आहे. राईस मिल ते गांधीनगरला यायला जितका वेळ लागत होता त्यापेक्षा जास्त वेळ गांधीनगरचा हा रस्ता पार करण्यासाठी लागत होता. नागरिकांची आणि लहान मुलांची होणारी हेळसांड आणि त्रास लक्षात घेऊन आमच्या ट्रस्टने हे सामाजिक कार्य केले आहे. आमच्या ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यासाठी आजऱ्यात आमचे कार्यालयही आहे याठिकाणी निराधार, वृद्ध पेन्शन योजनांचे काम केले जाते. अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली.
मनोगत व्यक्त करताना आकाश शिंदे म्हणाले, याच रस्त्यावरून आवजड वाहने जाताना आवंडी वसाहत, गांधीनगर, छ. संभाजी नगर, दरवाजकर कॉलनी, नेवरेकर कॉलनी मधील शाळेला जाणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर रस्त्यावरचे पाणी उडायचे. लोकांना त्रास होत होता. याची दखल घेत रणजित सरदेसाई यांच्या ट्रस्टने केलेले कार्य अतुलनीय आहे. निर्णय क्षमता असणारी व्यक्ती समाजाभीमुख निर्णय कसे घेऊ शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. नगरपंचायतचे अधिकारी आणि कर्मचारी जणू आपल्या खिशातले पैसे वापरल्यासारखे आणि जणू लोकांच्यावर मेहरबानी केल्यासारखे वागतात हे चुकीचे आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे या खुर्चीवर बसले आहेत याची जाणीव त्यांना असणे गरजेचे आहे. प्रशासनाने यावरून बोध घ्यावा असे यावेळी त्यांनी म्हटले. याप्रसंगी धर्मवीर नवरात्र उत्सव गांधीनगरचे कार्यकर्ते उपस्थित होते.