भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क प्रदान करणाऱ्या 14 जुलै 2022 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील पारीत झालेल्या निर्णयाचे तातडीने कायद्यात रुपांतर होऊन वैधानिक रितीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी गडहिंग्लज परिमंडळाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा अशी विनंती मागणी यापूर्वी केली होती. दिनांक 14 जुलै 2022 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देणारा महत्वपूर्ण ठराव पारीत झाला आहे. त्याबद्दल कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बंधुभगिनिंच्या कडून आभार. पण सदर ठरावाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी उत्पन्न समिती गडहिंग्लजसह इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यक्षेत्रातील शेतकरी मतदानापासून वंचित राहणार आहे.
विकास सेवा संस्था प्रतीनिधी, ग्रामपंचायत प्रतीनिधी, अडत व्यापारी, हमाल, तोलारी याना मतदानाचा हक्क आहे मग कृषी उत्पादक शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क का नाही? हे अन्यायकारक असून राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या प्रस्तुत ठरावाचे तातडीने कायद्यात रूपांतरणाने शासन निर्णय निर्गमित होऊन कार्यक्षेत्रातील किमान 20 गुंठे शेतजमीन धारण करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना वैधानिक रितीने मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी या निवेदनातून श्री. सावंत यांनी केली आहे.