राष्ट्रीय महामार्गावरील गिजवणे ओढ्यावर घडला अपघात
वाहन चालकावर गुन्हा दाखल
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर-बांदा महामार्गावरील गडहिंग्लज - आजरा मार्गावरील गिजवणे ओढ्यावर आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये भरधाव मारुती सुझुकी इगिन्स या वाहनाने मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या शरद बाबुराव गुडसे (वय वर्ष 78, रा. घाळी कॉलनी गडहिंग्लज) यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाहन चालकावर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज पहाटे शरद गुडसे गडहिंग्लज - आजरा रोडवर फिरायला गेले होते. गिजवणे गावच्या ओढ्यावर चालत जात असताना याच दरम्यान गडहिंग्लजच्या दिशेने भरधाव आलेल्या मारुती सुझुकी इग्रीस (टी एस 08, एच एच 5718) या वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत गुडसे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सदर वाहन तेथील कठड्याला जाऊन धडकल्याने वाहनाच्या पुढील भागाचे नुकसान देखील झाले आहे. याप्रकरणी सदर वाहन चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.