आजऱ्यात शिवसेना उबाठाचे वीजवितरण कपंनीला निवेदन
आजरा (हसन तकीलदार ): शेतकऱ्यांना भरमसाठ वीजबिले देऊन कारवाईची नोटीस बजावल्यामुळे शिवसेना उबाठातर्फे उपअभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शाखा आजरा यांना निवेदन देऊन तक्रारीचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वीज वितरण कंपनी आजराकडून बंद असलेल्या शेतीपंपाना तसेच ज्या शेतकऱ्याची 3 व 5एच. पी. ची मोटर आहे अशा शेतकऱ्यांना 10 एच. पी. ची आवाच्यासव्वा वीज बिले देऊन वर कारवाईच्या नोटीसा पाठवून शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला आहे. शासनाने 7•5एच. पी. पर्यंतच्या शेती वीजपंपाना वीज बिल माफी केलेली असतानासुद्धा शेतकऱ्यांना आवाजवी बिले पाठवली आहेत आणि वर जर ही बिले भरली नाही तर कारवाईची नोटीस सुद्धा पाठवून शेतकऱ्यांची नाहक बदनामी व चेष्टा करण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केलेला आहे.
आजऱ्यातील हुसेन मुराद या शेतकऱ्याची 5 एच. पी. ची शेती वीज पंपाची मोटर सन 2019 पासून बंद आहे तरीसुद्धा या शेतकऱ्याला 89 हजाराचे वीज बिल पाठवले आहे. या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याने पाहणी करून बिल माफिसाठी अर्ज केला आहे. तरीसुद्धा पहिला वीज बिल भरा नंतर बघू अशा प्रकारचे उत्तर अधिकाऱ्याकडून येत आहे. एवढेच नाही तर 3 एच. पी. आणि 5एच. पी. पाणीपरवाना व डिपॉझिट असणाऱ्यांना सरसकट 10एच. पी. ची संगणकाला दफ्तरी नोंद घेऊन 3व 5एच. पी. वाल्याना 10एच. पी. ची आवाजवी वीज बिले पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चूक कंपनीची पण भुर्दंड शेतकऱ्यांना अशी अवस्था झाली आहे. या सगळ्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजरातर्फे कंपनीला निवेदन देण्यात आले आहे. जर समस्यांचे निराकरण व समाधान झाले नाही तर आजरा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार उपशहर प्रमुख समीर चांद, तालुकाप्रमुख शिवाजी आढाव, दिनेश कांबळे (पेरणोली ), संकेत सावंत, सुरेश कांबळे, हरिश्चंद्र व्हराकटे, स्वप्नील शिंदे, महेश पाटील, रवींद्र सावंत, हुसेन मुराद आदी शिवसैनिक उपस्थित होते.