प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांचे प्रतिपादन
साधना प्रशालेत NMMS व पाचवी/ आठवी स्कॉलरशिप परीक्षेबाबत पालक सभा
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आयुष्यात स्थैर्य प्राप्त करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा देणे फार गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा होय. आज स्पर्धात्मक परीक्षांना बसणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साधना प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी केले.
गडहिंग्लज येथील साधना प्रशालेत इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप आणि एनएमएमएस तसेच स्पर्धा परीक्षा यावर आधारित पालकांची सभा घेण्यात आली. त्यावेळी प्राचार्य कुटिन्हो मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सभेमध्ये इयत्ता चौथी व सातवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे एकूण १७८ पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जे. के. सोज यांनी केले. गणित या विषयाचे मार्गदर्शन सतीश कांबळे व विनोद राठोड यांनी केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप सांगितले. पालकांनी आपल्या पाल्याला जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी बसवण्याची गरज आहे. आजकाल मुले तासभर सुद्धा अभ्यास करायला कंटाळतात असे सांगण्यात आले. स्कॉलरशिप विभागप्रमुख अफसाना यळकुद्रे व कविता कोळेकर, रॉबर्ट बारदेस्कर, ॲड . शीतल साळवी , सौ. नाज खलीफा, पत्रकार महादेव तुरंबेकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी पालकांना मार्गदर्शन केले. आभार साधना पाटोळे यांनी मानले.