Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येणार

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची माहिती


 



मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी ₹12,000 इतके निवृत्तीवेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.


कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, सन 1996 मध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला. त्यानुसार, महाराष्ट्र राज्याने 2007 मध्ये नियम आखले आणि 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाकडे 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. मात्र, 60 वर्षांनंतर त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.


ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेच्या अनुषंगाने, नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आला असल्याचे मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले. यात 10 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹6,000 (50%); 15 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹9,000 (75%) आणि 20 वर्षे किंवा अधिक नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹12,000 (100%) असे लाभ देण्यात येईल.


या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत 58 लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत.


कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले की, "या योजनामुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. कायद्याच्या तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.