गडहिंग्लजला शिवराज महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
सौरभ पाटील, कु.ज्योती माने यांचा 'गुणी शिवराजीयन' म्हणून गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आज काळाची गरज ओळखून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यापीठ व देशाच्या शिक्षणाबरोबरच जगाच्या शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. शिक्षणात आता आपली बरोबरी अमेरिका, इंग्लंड अन्य देशातील नामवंत विद्यापीठाशी असणे गरजेचे आहे. आता बदलत्या परिस्थितीचा विचार करून शिक्षणात आमुलाग्र बदल होत आहे. दर्जात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा शिक्षणाची व्यवस्था असणे फार महत्वाचे आहे असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.एन. पाटील-गिजवणेकर, गोकुळचे संचालक आर.के. मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा अध्यक्ष क्रांतिसिंह पवार-पाटील, साखर कारखाना उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. नंदकुमार कोल्हापुरे व प्रास्ताविक सचिव प्रा. अनिलराव कुराडे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विधान परिषद सदस्य आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आजच्या शिक्षणात संस्कारक्षम शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. घराला घरपण देणारे शिक्षण शिक्षणातून मिळणे गरजेचे आहे. आज बदलत्या जगाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून आज समाजातील चित्र बदलणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून सर्वांनी अपडेट राहिले पाहिजे. आज सर्व जग सर्वच क्षेत्रात खुले झाले आहे. शेती व रोजगारात टेक्नोलॉजीचा उपयोग करून जगाचे मार्केट कसे आहे याचा विचार करून प्रगती साधली पाहिजे. विद्यार्थ्यांनी संघर्ष करून हिंमतीने शिक्षण घेऊन आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हावे असेही आमदार देशमुख यांनी सांगितले. आज जग सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. ज्या देशात स्त्रिया पुरुषांच्या साथीने कार्यरत आहेत, ते देश प्रगतीच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. महिलांना प्रवाहात आणणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात प्रा. किसनराव कुराडे यांनी शेलार मामांची भूमिका बजाविली आहे याबाबत आमदार देशमुख यांनी धन्यता व्यक्त केली.
या कार्यक्रमात नॅक 'ए' ग्रेड मानांकन मिळविण्यात मोलाची भूमिका बजाविल्याबद्दल प्रमुख महाविद्यालयातील नॅक समन्वयक, सहसमन्वयक व शिक्षक टीम यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना व 'गुणी शिवराजीयन' म्हणून सौरभ पाटील, कु.ज्योती माने यांना गौरविण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडाक्षेत्रात सलग अकरा वेळा जनरल चॅम्पियनशिप पटकाविल्याबद्दल महाविद्यालयाच्या खेळाडूंचे तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेते खेळाडू व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या या शिवराज महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे संचालक आर. के. मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा अध्यक्ष क्रांतिसिंह पवार- पाटील, साखर कारखाना उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे उपाध्यक्ष जे.वाय.बारदेस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उद्योजक माधव पोटे-पाटील, सौ. चेता कदम, पत्रकार दत्ता देशपांडे, बाबासाहेब देसाई, संपतराव देसाई, संस्थेचे उपाध्यक्ष के. बी. पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे, संचालक राजू मांडेकर, बसवराज आजरी, ॲकेडेमिक डायरेक्टर डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुज, नॅक समन्वयक प्रा. किशोर आदाटे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिष्ट्रार संतोष शहापूरकर, शिवराज इंग्लिश मेडियमचे प्राचार्य ए. बी. पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. गौरव पाटील, डॉ. विद्या देशमुख, प्रा. प्रियंका जाधव यांनी केले.