आय.एस.एच.बायोटेक लिमिटेडचे सी.ई.ओ.व आय.एस.एच. ग्रुपचे संचालक डॉ.नितीन देसाई
शिवराज महाविद्यालयात 'ॲन इंटरडीसीप्लनरी नेचर ऑफ सायन्स' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सर्वच क्षेत्रात बायोटेक्नॉलॉजीचे योगदान खूप मोलाचे आहे. शिवाय बायोटेक्नॉलॉजीची व्यापकता वाढली आहे. यातून अनेक क्षेत्रांना खूप फायदा होत आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये समतोल आहार, उत्तम आरोग्य आणि पर्यावरण पूरक असे वातावरण हेच नव्या जगाची मुलभूत गरज बनली आहे. ही गरज अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने विचार व संशोधन करण्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी महत्वाची भूमिका बजावत आहे असे प्रतिपादन सँटीगो (यु.एस.ए) येथील आय.एस.एच.बायोटेक लिमिटेडचे सी.ई.ओ.व आय.एस.एच. ग्रुपचे संचालक डॉ.नितीन देसाई यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात 'अँन इंटरडीसीप्लनरी नेचर ऑफ सायन्स' या विषयावर राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बीजभाषण करीत होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आय.क्यू ए.सी.), सायन्स व टेक्नोलॉजी विभागाच्यावतीने आयोजित परिषदेच्या अध्यक्षस्थानीशिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. संस्थेचे उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, ॲड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी स्वागत करून आपला भारत हा तरुण शास्त्रज्ञांचा देश आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय G-20 शिखर परिषद यावर्षीपासून होत आहे.संपूर्ण देशभर नवे शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आला आहे. यासह विविध विषयांचा अंतर्भाव या परिषदेत करण्यात येत आहे. त्यामुळे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील निर्मिताला चालना व बळ देण्यासाठी तरुण संशोधक, संशोधक शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त ठल य देशाच्या विकासात अनमोल योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होईल या उद्देशाने हे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आले आहे असे सांगून महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला.
समन्वयक प्रा.किशोर अदाटे यांनी प्रास्ताविकातून परिषदेचा हेतू स्पष्ट केला. संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.नितीन देसाई यांनी आजही महाविद्यालयाशी ऋणानुबंध जपले आहे. त्यांनी विविध क्षेत्रात घेतलेली झेप एक शिवराजीयन म्हणून आम्हास अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
या बीजभाषणामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. देसाई पुढे म्हणाले, आज १४० कोटी लोकसंख्येला पुरसे अन्न पुरविण्याची क्षमता फक्त बायोटेक्नॉलॉजीच्या तंत्राने पिकविलेल्या पिकांमध्ये आहे. जगात या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून देशातील सर्वच गतिमान करणे शिवाय जे-जे हवे ते मिळविण्यासाठी उत्पादन प्रक्रिया वाढविण्यासाठी या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीचे महत्व संपूर्ण जगाला कळत आहे.
मानवी जीवनाशी निगडीत असणारे हे क्षेत्र संशोधनाच्यादृष्टीने विकसित झाले आहे. शेती, उद्योग आणि आरोग्य'क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत या क्षेत्रात संशोधकांना खूप संधी आहे. या संधीचा उपयोग करून घेणे काळाची गरज असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.औषध निर्मिती, अन्नधान्य उत्पादन, स्टेमसेल, क्लोनिंग मानवी शरीरासाठी आवश्यक घटक यांसह विविध क्षेत्रातील संशोधन व निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणारी बायोटेक्नॉलॉजी अत्यंत उपयुक्त आहे. याचा वापर करून संपूर्ण जग झपाट्याने प्रगती करीत आहे. त्यामुळे सायन्स क्षेत्रातील या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वांनी करून घ्यावा असे आवाहन डॉ.नितीन देसाई यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्रा.किसनराव कुराडे यांनी आज नव्य तंत्राने संपूर्ण जग विविध क्षेत्रात अग्रेसर होत आहे. नवी पिढी देखील त्या दिशेने आगेकूच करीत आहे. हे बदलते तंत्रज्ञान स्विकारून या विश्वाला गवसणी घालण्याची क्षमता नव्या पिढीमध्ये येत आहे. यातून आपल्या देशाने जगावर प्रभुत्व मिळविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट करून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात आरंभ स्टोन सप्लायर्सचे अरुण जाधव व आर्यन देसाई यांचा सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात तसेच तज्ञ मार्गदर्शकएन.एम.आय.एम.एस.युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ.बजरंग कुंभार 'बायोफोरमॅटिक्स आणि ड्रग डिस्कव्हरी' व एन.एम.आय.एम.एस. युनिव्हर्सिटी मुंबईचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. गुरुदास माने यांनी नॅनोटेक्नोलॉजी आणि फोटो कॅटॅलिटिकल अप्लिकेशन या विषयावर मार्गदर्शन केले.
सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या परिषदेमध्ये प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, परिषदेचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार सरतापे आदींसह अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशन, ओरल प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून प्रत्येकी तीन संशोधकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. या राष्ट्रीय परिषदेमध्ये १७५ हून अधिक संशोधक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. अल्ताफहुसेन नायकवडी व प्रा. प्रवीण गंदुगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार परिषदेचे सह समन्वयक डॉ. ए. एम. हसुरे यांनी मानले.




