कोल्हापूर : परतीच्या पावसाचे धुमाकूळ सुरूच असून कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांनी वाढ झाली. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी स्थानिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसाने सोयाबीन, भुईमूग पिकाला फटका बसत आहे. या पावसाने अजून बऱ्यापैकी सोयाबीन कापणी व मळणी खोळंबल्याचे चित्र आहे. पाऊस असाच राहिल्यास भुईमूगलाही कोंब येण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविली जात आहे.
परतीच्या पावसाने राजाराम बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला असून गेल्या 24 तासांपासून पावसाने उघडीप दिल्याने बंधाऱ्यावरील पाणी ओसरण्यास मदत झाली. आता पुन्हा आज सायंकाळी सहा वाजल्यापासून जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी परतीचा पाऊस सुरू असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली
तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ बंधारा पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड आणि वारणा नदीवरील तांदुळवाडी पाण्याखाली गेला आहे.हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला यलो अलर्ट आजपर्यंत आहे.
अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग
गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग केला जात आहे. धरणातून सध्या कृष्णा नदीपात्रात 1 लाख 17 हजार 951क्युसेकने विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणात सध्या 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.