Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

ग्रहणकाळात कोणतेही योग्य साधन न वापरता सूर्याकडे थेट पाहू नये 


नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी):
25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून  भारतात या ग्रहणाची सुरुवात सूर्यास्तापूर्वी दुपारच्या वेळेत होणार आहे. हे ग्रहण भारतातील बहुतांश ठिकाणांहून पाहता येईल. मात्र, अंदमान आणि निकोबार बेटे तसेच ईशान्य भारतातील ऐझवाल, दिब्रुगड, इम्फाळ, इटानगर,कोहिमा,शिवसागर,सिलचर,तमेलाँग इत्यादी काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार नाही. ग्रहणाचा मोक्ष भारतातील सूर्यास्ताच्या वेळेनंतर होणार असल्याने भारतातून ग्रहणाचा मोक्ष दिसणार नाही.

देशाच्या ईशान्य भागातून पाहताना ग्रहण मध्यकाळात चंद्राच्या सावलीने सूर्यबिंबाचा सुमारे 40 ते 50 टक्के भाग व्यापलेला दिसेल. देशाच्या इतर भागांमध्ये यापेक्षा कमी प्रमाणात सूर्यबिंब व्यापलेले दिसेल. दिल्ली आणि मुंबई या शहरांचा विचार करता ग्रहणाच्या मध्य काळात चंद्राने सूर्यबिंबाचा अनुक्रमे 44 टक्के आणि 24 टक्के भाग व्यापलेला दिसेल. या दोन्ही शहरांमध्ये ग्रहणाच्या स्पर्श काळापासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा कालावधी अनुक्रमे 1 तास 13 मिनिटे आणि 1 तास 19 मिनिटे असेल. चेन्नई आणि कोलकाता या शहरांसाठी बिंब स्पर्शापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी अनुक्रमे 31 मिनिटे आणि 12 मिनिटे असेल.

हे खंडग्रास ग्रहण युरोप, मध्य-पूर्व, आफ्रिकेचा ईशान्य भाग, पश्चिम आशिया, अटलांटिक महासागराचा उत्तर भाग आणि हिंदी महासागराच्या उत्तर भागातून दिसेल.

यानंतरचे भारतातून दिसू शकणारे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. ते खग्रास सूर्यग्रहण असेल. मात्र, देशाच्या सगळ्या भागांतून हे खंडग्रास स्वरूपाचे सूर्यग्रहण म्हणून पाहता येईल.

सूर्यग्रहण म्हणजे काय?

अमावास्येच्या दिवशी जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्रबिंबाची सावली जेव्हा सूर्याला अंशतः झाकते तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण घडून येते.

ग्रहणकाळात सूर्यबिंबाकडे थोड्या कालावधीसाठी देखील योग्य साधन न वापरता थेट पाहू नये. ग्रहण काळात जरी चंद्रबिंबाने सूर्याचा बहुतांश भाग व्यापलेला असेल तरीही अशा वेळी कोणतेही योग्य साधन न वापरता थेटपणे ग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकते. सूर्यग्रहण पाहण्याची योग्य पद्धत म्हणजे अल्युमिनाईज्ड मायलार, ब्लॅक पॉलिमर, वेल्डिंगसाठी वापरली जाणारी 14 नंबरची काच यांच्या माध्यमातून सूर्याकडे पाहणे किंवा टेलिस्कोपच्या सहाय्याने मिळालेली सूर्याची प्रतिमा पांढऱ्या बोर्डवर प्रक्षेपित करणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.