बेळगाव: केएलई सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांना प्रतिष्ठेचा 'सहकार उद्योग गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे काल (रविवारी) आयोजित दिमाखदार सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील सेनापती बापट मार्गावरील हॉटेल जेडब्ल्यू मेरीऑटच्या सभागृहात भारतातील साखर उद्योगाच्या विकासात मुख्य भूमिका निभावणाऱ्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे (डीएसटीए) वार्षिक अधिवेशन काल रविवारी पार पडले. यावेळी आयोजित सोहळ्यात पवार यांच्या हस्ते प्रभाकर कोरे यांना साखर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. साखर उद्योगाच्या विकासासाठी विशेष करून उत्तर कर्नाटकातील साखर उद्योगाच्या विकासासाठी उल्लेखनीय प्रयत्न करत असल्याबद्दल कोरे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रीय साखर संस्था कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन आणि महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.