राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे शिफारस
नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित दोन स्थळांना राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून घोषित करण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे.
२३ सप्टेंबर १९१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे अस्पृश्यता निर्मूलनाचा संकल्प केला होता ते वडोदरा येथील संकल्प भूमी वटवृक्ष परिसर स्थळ राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करावे, अशी शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. .हे ठिकाण शंभर वर्षांहून अधिक जुने आहे आणि डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या सामाजिक सन्मानाच्या क्रांतीचे साक्षीदार आहे.
तसेच दुसरे स्थळ म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले त्या महाराष्ट्रातील साताऱ्यामधील प्रतापराव भोसले हायस्कूलला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारसही राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे.या शाळेची नोंदवही अजूनही अभिमानाने एक विद्यार्थी म्हणून भीमराव यांच्या मराठीतून केलेल्या स्वाक्षऱ्या दर्शवते.
या शिफारशी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने संस्कृती राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासमोर सादर केल्या आहेत.सामाजिक समरसता आणि समतेच्या क्षेत्रातील हा एक अमूल्य वारसा आहे आणि राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन केले पाहिजे, असे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी सांगितले.