Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

 

🔘 देहू, पुणे येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज  मंदिराचे करणार उदघाटन

🔘 मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे करणार उदघाटन

🔘 'मुंबई समाचार'च्या द्विशताब्दी महोत्सवात होणार सहभागी 

मुंबई (सौजन्य: पीआयबी): पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी १:४५ च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे उदघाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी ४:४५ च्या सुमाराला  मुंबई मधील जलभूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत.

संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आले, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची ३६ शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे. या मंदिराचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

मुंबईमधील  जल भूषण इमारत हे १८८५  सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती.  राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.ह्या इमारतीचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे,  १९४६ मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.या गॅलरीचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. १ जुलै,१८२२ रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर १८३२ साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाणार आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.